golden sands

English/मराठी लेखन, अमेरिकेतील जीवन, कविता, प्रवासवर्णन, स्फुट.

Name:
Location: New Jersey, United States

I write for myself.

Thursday, January 17, 2008

अशीच अमुची शाळा असती- भाग ३

मुलं. शाळा म्हणजे भींती नव्हेत. शाळा म्हणजे कम्प्युटर्स किंवा इतर साधनं नव्हेत. हे जितकं खरं भारतात आहे, तितकंच खरं जगात इतर कुठेही आहे- असायला हवं. शिकवायच्या पद्धती वेगळ्या असल्या, मुलं सावळ्याऐवजी गोरी असली, तरी शाळेचा आत्मा असतात ती मुलंच. पण इथल्या मुलांचं जग, मी शाळेत होते त्या जगापेक्षा फार वेगळं आहे. गेल्या शतकात जगाचा नक्षा इतका पालटलाय, की आपण कुठे आहोत तेच कळेनासं झालंय. आम्ही लहान असतांना आमची आजी मिक्सर/टी. व्ही ला हात लावायला घाबरायची. आमचे आईवडील अजुनही कंप्युटर्सशी झगडतायत, आणि आम्ही ह्या सगळ्यांवर ताण केली, असं वाटत असतांनाच ही पुढची पिढी बघून मला म्हातारं वाटायला लागलं...

एकदा मी शिकवण्यात अगदी तल्लीन झाले होते, तर एका मुलीकडे माझं लक्ष गेलं. तिचा चेहरा माझ्याकडे, डोळे माझ्यावर रोखलेले, पण डोळ्यात एकही भाव नव्हता, किंवा मी बोलतेय ते कळतंय ह्याची काहीही पावती नव्हती. मला जरा शंका आली, म्हणून तिच्या नकळत मी फिरत फिरत तिच्या जवळ गेले, तर डेस्कखाली हातांची बोटं मोबाईलवरून Text Message लिहत असलेली!!! शाळेत मोबाईल खरंतर allowed नाहिये. त्यातून वर्गात तर घोर अपराध. पण मला तिला धाक दाखवून सोडून द्यायला लागलं, कारण निदान इथल्या शाळांत तरी आता हे सर्रास चालू झालंय, तर किती किती मुलांना असं वर्गाबाहेर काढायचं??? ह्यावरून जाणवलं मात्र हे, की आजच्या मुलांच्या शाळेतील आणि शाळेबाहेरच्या जगात इतकी भयंकर तफावत निर्माण झालिये, शिक्षणाला काही अर्थ द्यायचा असेल, तर शिक्षणाने ह्या मुलांच्या वेगाशी जमवून घ्यायला हवंय.

मग एकदा मी गंमत केली. त्यांना एका कागदावर एक Text message, एक कादंबरीतला उतारा, एक वर्तमानपत्रातली बातमी, एक कविता, ह्यातून काही ओळी काढून दिल्या, आणि त्यांना विचारलं- की ह्या ओळी कुठून आल्यात ते ओळखून दाखवा. त्यांनी अर्थात सर्वात आधी ओळखले ते SMS आणि त्यावरून वर्गात भरपूर हशा पिकला- की मिस. डी. तुम्ही पाठवता का SMS वगैरे वगैरे... पण त्यातून त्यांना हे कळालं- की वाचनासाठी आवश्यक असलेल्या कितीतरी strategies त्यांच्याकडे आधीपासूनच आहेत. कविता वाचतांना काय अपेक्षित असतं, हे अगदी ७वीत शाळा सोडलेल्या मुलाला सुद्धा माहिती असतं. फक्त ह्या strategies हुकमी त्यांना हव्या तेंव्हा वापरता यायला हव्यात. आपण वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या लेखनप्रकारांकडे वळतो, ह्याचं भान आलं पाहिजे, म्हणून हा प्रपंच.

वर्गात एक दिवस निबंध लिहायला मूड यावा म्हणून मागे संथ सितार लावली. एकदा शिकवलेली माहिती किती लक्षात राहिली, हे पहायला टेस्ट न घेता कंप्युटरवर एक खेळ तयार केला, की त्यातून त्यांना मजा येईल. एखादी कादंबरी शिकवत असतांना त्यावर आधारित चित्रपट वर्गात दाखवायचा, हे तर आता सर्रास सगळे शिक्षक करतात. कवितेऐवजी जर कोणाला एखाद्या pop गाण्याचं विश्लेषण करावसं वाटलं, तर ते ही करता येईल, अशी सूट... आणि इतकं करूनही मुलांचं विश्व वेगळं, ते वेगळंच राहतं. त्या विश्वात शिरण मला जवळजवळ कधीच शक्य झालं नाही. अमेरिकेत मला ३च वर्ष झालियेत म्हणून, की माझा स्वभाव मुळात फारसा outgoing नाही म्हणून, कोणजाणे. पण माझ्या सहकारी शिक्षिकेकडून जे जे कळलं, आणि जे काही थोडं बघायला मिळालं, त्याने माझे अगदी डोळे उघडले.

एक दिवस एक मुलगा शाळा संपल्यावर होमवर्क किंवा राहिलेले assignments पूर्ण करायला वर्गात येऊन बसला. आम्ही दोघी होतोच तिथे- तर गप्प निघाल्या. हा मुलगा तसा वाया गेलेलाच म्हणायला लागेल. बरेचदा शाळा चुकवणारा, अभ्यासात जेमतेम, पण उलट उत्तरं द्देण्यात वस्ताद, आणि वर्गातला पॉप्युलर गुंड!! तर त्या शिक्षिकेने विचारलं, ’काय रे, अभ्यासात लक्ष नाही तुझं, मग तू पुढे काय करणार? ’ ठरलेलं उत्तर, ’कोणजाणे, आत्ताच मी शाळेनंतर मॅकडोनल्ड मधे काम करायला लागलोय. पैसे नसले तर गर्लफ्रेंड मिळत नाही, खी खी खी...” ह्यावर आम्ही हसलो. “कुठे राहतोस?” “न्यू यॉर्कजवळ त्या भागात...” “तिथे गँग असतात म्हणे...” “हो............आमच्यात दोन पंथ आहेत, काळे आणि लाल. (त्याने काय शब्द म्हटले ते ही मला निटसं कळलं नव्हतं). आता परवाच माझा एक मित्र मेला.” “काय!!!!!!!” “हो, त्याने मला रात्री हाक मारली, की त्या टोळीला हाणायला जायचं, तर मी असाच पायजाम्यात बाहेर पडलो, आणि तिथे मारामारी झाली, मी लवकर घरी आलो. तर कोणीतरी पिस्तुल आणलं होतं, तो थांबला, आणि मेला.... त्याच्याजागी मी असू शकलो असतो!” “हे तुला कळतं ना, तरी मग तु का गँगमधे जातोस?” “मी गेलो नाही, ते अनुवांशिकच असतं. माझी आई मला फार ओरडते. तिला हे आवडत नाही. पण माझे वडिल त्या गॅंगमधे होते.. ते नंतर आम्हाला सोडून निघून गेले. पण त्यांच्यामुळे आता मी ही आपोआपच त्या गँगचा मेंबर झालो. गँगवाले एकमेकांना मदत करतात मिस. जॅकसन, आता मला ही नोकरी लागली, ती त्यांच्यामुळे, तर मी कसं काय नाही म्हणणार? ऐकावं लागतं, नाहीतर तुम्हीच मराल एक दिवस...” ह्यावर आम्ही गप्प. हा १६-१७ वर्षाचा, ११वीतला मुलगा आम्हाला गँगचं तत्त्वज्ञान समजावून सांगत होता, आणि त्याचं ते रात्री घरी गेल्यावरचं विश्व इतकं भयानक, त्यात जगायचे/ तगायचे धडे आम्ही त्याला देऊ शकत नव्हतो.

दुसरी कथा एका मुलीची. १२वी, वय साधारण १७, उत्तम रेकॉर्ड, चांगले मार्क मिळाल्यामुळे "Advanced English” वर्गात वर्षाच्या सुरुवातीला दाखल झालेली. तिची आई एक दिवस भेटायला आली होती, तर मी माझ्या सह-शिक्षिकेला विचारलं, की काय झालं? तर कळलं, की मुलगी प्रेग्नंट आहे. शाळा बुडवावी लागेल, पण निदान बाळ होईपर्यंत तरी तिला अभ्यास करायचा आहे, आणि नंतरही शाळा सोडायची नाहिये, त्यामुळे तिचे पेपर, टेस्ट मी तुम्हाला घरून करून पाठवले तर चालतील का? हे विचारायला आई आलेली.

१४व्या वर्षापर्यंत गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड नसेल, तर तुम्ही loser category तले, अशी ही शाळा संस्कृती. Prom, म्हणजेच शाळेतला पहिला formal डान्स, त्याला सगळ्यात सेक्सी ड्रेस घालून कोण आलं, त्यात कोणाचा पार्टनर कोण होतं, Prom-queen/ king कोण झालं, हे त्या वयातल्या मुलांचे जीवनमरणाचे प्रश्न बनतात. त्याचंही commercialization करून शाळांना पैसे मिळतात, पण मुलं कुठली किंमत मोजतायत, ते त्यांना दिसतंय का? अर्थात, एकीकडे मध्यमवर्गीय, साधारण पालक आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायचा प्रयत्न करत असतातच. पण "Do whatever, just don't get pregnant” असा काहींचा approach, तर ६ ला घरी आलं नाही तर जेवण नाही, असेही काहीजण.

इथे मुलं पॉकेटमनी साठी छोट्यामोठ्या नोकऱ्या करतात, ते तर सगळ्या जगाला माहिती आहे, पण आजची मुलं किती भयंकर exposure ला सामोरी जातायत, किती वेड्या peer-pressure खाली जगतायत, आणि त्यातून त्यांचं बाल्यच हरवतंय असं मला वाटतं.

परवाच माझ्या World Literature च्या वर्गात मी मोठ्या उत्साहाने रामायण शिकवायला घेतलं. साधारण कथेचा सांगाडा समजावून सांगितला, तर एका मुलीचा लगोलग प्रश्न, “म्हणजे सीता रावणाची mistress झाली का? Did he rape her?” गळ्याशप्पथ सांगते, ह्याचा विचार मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कसा केला नाही, ह्याचं मलाच नवल वाटलं, पण त्याहून नवल, की सगळ्या वर्गासमोर, शिक्षिकेला हा प्रश्न विचारता येतो, अशी शिक्षणसंस्थाही असू शकते, त्याचं..... अमेरिकेचं obsession with sex and sexuality हा एक मोठाच विषय आहे, पण शाळेतही त्याचे इतके पडसाद उठतील अशी कल्पना नव्हती. नंतर एकदा अशीच माझी सह-शिक्षिका एका मुलीला douchebag चा अर्थ सांगत बसली होती. तुम्हालाही माहिती नाही म्हणता? शोधा, शोधा, इंटरनेटवर शोधा, बरंच काही सापडेल ह्याची गॅरेंटी आहे!

असं असलं, तरी मुलं ती मुलंच. अगदी सेक्सकडे बघायचा त्यांचा दृष्टीकोणही किती निरागस असतो कधीकधी! उत्सुकता असते. एकमेकांना "गे" म्हणून चिडवणंही असतं. माझ्या सह-शिक्षिकेचं जरा स्थूल पोट पाहून एक मुलगा विचारतो, “तुम्ही प्रेग्नंट आहात का?” बिच्चरी, तिचं तर लग्नंही झालेलं नाही!
आणि बाकी सुद्धा बरचसं असतं. एकदा एक मुलगी शेवटच्या पिरियेडला आली, तीच कोकलत, की मला भूक लागलीये. मी तिला म्हटलं, “जेवली नाहिस का?” तर तिची आई बहुतेक डिव्होर्सी, एकटी कमावणारी असल्यामुळे ओव्हरटाईम करत असते. तिला मुलांचा डब्बा करायला कधीच वेळ नसतो. तर हिला घरी जाऊन फ्रीजमधे असेल ते किडूकमिडूक खाऊन पोट भरावं लागतं. आणि हीच कथा साधारण अमेरिकेतल्या कुठल्याही शहरी जीवनात दिसते. काही शिक्षिका स्वत: २ तास ड्राइव्ह करून रोज शाळेत ७.३० ला पोचतात, त्यांच्याही मुलांची आहे.


माझ्या सह-शिक्षिकेने तिच्या ड्रॉवरमधे थोडा सुकामेवा, काही दाणे, चणे होते, ते लगेच काढून ह्या मुलीला दिले, आणि वर्गातही वाटायला लावले. एकीकडे कोलमडणारी समाजव्यवस्था, तर दुसरीकडे ही informality सुद्धा इथेच सापडते.

Tuesday, January 15, 2008

Writing, Voice and Anonymity

नुकतंच एक अतिशय मनोरंजक पुस्तक प्रसिद्ध झालंय- ह्या समस्त इंटरनेट वरील ब्लॉग, माहिती तंत्रज्ञान आणि चर्चेविषयी. Andrew Keen चं "The Cult of the Amateurs" नावाचं. त्यात त्याने असा दावा केलाय, की इंटरनेटमुळे आपली (म्हणजे अमेरिकन) संस्कृती बुडते आहे. ब्लॉग किंवा विकिपीडिया मुळे खरी आणि खोटी माहिती, निरपेक्ष आणि पक्षवादी लेखनामधे फरक करता येईनासा झालाय. चुकीची मतं, मतप्रवाह सुदृढ होऊ लागले आहेत, आणि खरंच उच्च दर्जाच्या लेखनाला किंवा इतर कोणत्याही उच्च दर्जाच्या प्रॉडक्ट ला अक्षरश: "भाव" (किंमत) " मिळेनासा झालाय. म्हणजे असं, की आजकाल आवडत्या गाण्यांची सीडी बाजारात जाऊन विकत घेण्यापेक्षा फुकट गाणी डाऊनलोड करता येतात. येवढंच नव्हे, तर अख्खी पुस्तकंच्या पुस्तकं इथे उद्धृत केलेली सापडू शकतात. चित्रपट, मालिकांचं तर विचारूच नका- इंटरनेटच्या youtube.com ह्या वेबसाईटवर कोणीही कसलेही व्हीडियो लावा, आणि त्याला प्रेक्षकवर्ग असणारच, ह्याबद्द्ल निश्चिंत असा.

कीन महाशयांचा सर्वात मोठा आरोप असा, की इंटरनेटवर आपल्याला आपलं खरं रूप दाखवावं लागत नसल्यामुळे वापरणाऱ्यांवर कोणतीही सामाजिक, राजकीय, व्यक्तिगत जबाबदारी नसते, आणि त्याचा गैरफायदा प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पातळीवर उचलत असतो.

मला हे सगळं पटतं आहे, तरीही कुठेतरी दुसऱ्या दिशेनेही विचार डोक्यात येताहेत। नुकतंच मी ह्याच ब्लॉगवर "नातिचरामी" नावाचं एक छोटं रसग्रहण लिहिलं, मेघना पेठेंच्या पुस्तकावर. मी हा ब्लॉग लिहिते, हे आमच्या बऱ्याच नातेवाईकांना/मित्रांना माहिती आहे. आईवडिलही मोठ्या कौतुकाने वाचत असतात मी काही नवीन लिहिलेलं. हे सगळं असतांना अर्थातच काय लिहायचं ह्याला मर्यादा येतात.
"नातिचरामि" सारख्या पुस्तकाला अनुकूल प्रतिसाद असणारं पोस्ट लिहिलं, हेच खरं म्हणजे माझ्या आयुष्यातलं एक political statement झालंय, हे खरं...

मनातल्या मनात आपल्याला अनेक गोष्टी पटत नसतात, पटत असतात, पण त्यांचा जाहिर स्वीकार करणे, ह्याला जे धैर्य लागतं, ते कधीकधी anonymity मधूनच येतं. सामान्य माणसांना तर ही anonymity लागतेच लागते, पण मोठेमोठे लेखकही अपवाद नाहीत. विशेषत: स्त्री लेखिकांनी कायम pseudonyms किंवा खोट्या नावाखाली लेखन केलं आहे. George Elliot म्हणजेच Mary Ann Evans हे उदाहरण प्रसिद्ध आहे. अशी स्वत:ची identity लपवण्यातही एक समझौता आला, जो खरं म्हणजे कोणालाही करायला लागता कामा नये। पण त्या पडद्यामागे राहून का होईना, आपले विचार स्टेजवर पोचले, ह्यातच त्या लेखिकांनी धन्यता मानली. त्या विचारांना वाचक/प्रेक्षकांनी उचलून धरलं, त्यातच लेखनाचं सार्थक झालं असं त्यांना वाटलं असावं.


मला मात्र असं वाटत नाही। माझ्याही आयुष्यात असा एक काळ आला, की मला लिहायला नकोसं वाटू लागलं. कारण मी जे लिहीन ते फार कडू जहर असेल अशी मला भीती वाटली. माझ्या लेखनातून मी माझ्या जवळच्या व्यक्तिंना दुखावणारं काही येऊ नये ह्यासाठी आटोकाट प्रयत्न करत राहिले, तर ते लेखनच फसवं, उथळ वाटायला लागलं.
लेखक-मी, आणि व्यक्ति-मी ह्यांत एक भींत मी निर्माण केली, तरी ती मर्यादा माझ्या जवळच्या लोकांना कळेल का? आणि अशी लक्षमणरेषा निर्माण करणं खरंच कितपत शक्य आहे, हा ही मोठा प्रश्नंच। मी म्हणजे केवळ माझं लेखन, असं समीकरण मांडणं, हा मोठा अन्याय आहे, पण माझ्या लेखनात जोवर मी नाही, तोवर त्या लेखनाला काय अर्थ? साध्या साध्या गोष्टी मोकळेपणाने मांडण्याचं स्वातंत्र्य मला नाही, जोवर मी मुलगी, सून, बायको, शिक्षिका ह्या भूमिकांमधे अडकलेली आहे.

मलाही वाटतं- एक Anonymous blog लिहावा. पण जे विचार माझ्या घरच्यांजवळ व्यक्त करण्याचं धैर्य़ माझ्यापाशी नाही, ते विचार इतरत्र लिहण्याची पळवाट मला नको आहे। माझ्या जवळच्यांनी मला माझ्या लेखनासकट स्वीकारावं, आणि लेखनातल्या माझ्या विचारांचं सावट माझ्या वैयक्तिक आयुष्यावर येऊ नये, तर त्या लेखनाला “आनंददायी म्हणता येईल.

टायटॅनिक सिनेमातल्या म्हातारीकडे, तरूण असतांना मनाविरूद्ध लग्नाला प्रतिकार करण्याची शक्ति नसते. ती जीव द्यायला बोटीच्या कठड्यावर चढून उभी राहते, पण आत्महत्या करण्याचंही धैर्य तिच्यात नसतं. तीच मुलगी, मग म्हातारी झाल्यावर आपण जॅकबरोबर कसा लपून प्रणय केला, हे अनोळखी वैज्ञानिकांना, आणि आपल्या नातीला बिनधास्त सांगत बसते.

कदाचित, कदाचित, ९०व्या वर्षी मी एक यशस्वी लेखिका होईन. कदाचित, कदाचित, त्यावेळी माझी भूमिका केवळ एक लेखिका येवढीच उरेल. कदाचित, कदाचित, Andrew Keen च्या प्रयत्नांनी माझ्या पुस्तकांच्या प्रतींच्या pirated copies इंटरनेटवरून फिरणार नाहीत. पण तोवर, हेच, असंच, थोडं इकडे, थोडं तिकडे, थोडं मनाचं, थोडं जनाचं....

Sunday, January 13, 2008

Deconstruction- what I understand of it.

Let me write this in English because I don't have the same concept vocabulary in Marathi.
Derrida is most widely known for 2 things: Deconstruction, which is a critique of Structuralism, and Differance. So to understand Derrida, first of all, we must understand the Structuralist notion of meaning. According to Structuralists, meaning is contained within a "Sign", which is made up of a "Signifier" and a "Signified".


SIGNIFIED: Take an object, for example: a ball. In our heads, there is a concept image for this object. (something round, something bouncing etc.). This concept image, this concrete object, which we think of, is the SIGNIFIED. Note that this concept image in everyone's mind can be different. Your image of ball might be red, mine can be blue- is the simplest example.
SIGNIFIER: Any word that denotes this concept image, any word which is a phonetic substitute for this concept image (or Signified) is called "SIGNIFIER".


SIGN: The sign is made up of these two things, the Signifier and the Signified.
Now, according to Structuralists, every Signifier relates to a definite Signified. So, when I say "Ball", the only concept image that can be related to this Signifier, is that of the ball. But when we start trying to define abstract concepts, this does not hold true anymore. Take the word "love" or "honesty". Now your concept of honesty/love, might be different from my concept of honesty/love.


If you are the author, you try to express yourself as clearly as possible. You create a whole poem about "love". Because this poem is a set of words, it has "signifiers", right? What is the "Signified" of your poem? It is the ONE DEFINITE meaning that YOU WANT TO EXPRESS. But what happens when I read the poem? I interpret it in a different way, and reach a different meaning. NOW MEANING HAS BECOME A TUG OF WAR BETWEEN THE READER AND THE AUTHOR. THE AUTHOR TRIES TO CONTROL MEANING, AND THE READER UNLEASHES IT. The author tries to use as many signifiers to suggest the signified, and yet, the signified can never be fully expressed.

According to Derrida, if we are all looking for ONE DEFINITE MEANING behind the text (Signified), but that meaning is perpetually, always, eternally "put off". Like a horizon, it keeps eluding the readers, it becomes more and more distant as we run towards it. मराठीत सांगायचं तर, आपल्याला जो प्रत्येक लेखनामागे एक विवि्क्षित अर्थ अपेक्षित असतो, त्या अर्थाची प्राप्ती सदैव लांबवली जाते.

Derrida also argues that Structuralists have taken for granted, the superiority of Signified over Signifier. He thinks that the history of philosophy is also a history of "Binary thought". There is duality and contrast of concepts throughout culture and philosophy, and one is always considered to be superior to the other. For example: Good/Evil, Man/Woman, Speech/Writing, Sane/Mad, Mind/Body. But in Binary thought, both the concepts are dependant upon each other, and are defined by each other. What is good? Good is something that is not Evil. What is Madness? Madness is something that which is not Sanity. One is the dominant mode, other is the dominated mode. One is superior, other is inferior. One is central, other is marginal. (That is why women/backward casts/immigrants are called Marginalised communities).

Every text makes a subtle argument/rhetoric like this. At the spur of the moment, I am thinking of Jane Austen's Pride and Prejudice. The novel makes a subtle argument that women should marry a man who they think is superior to them, in social class, intellect, and personality. Derrida thinks that by default, every text also offers the opportunity for a counter-rhetoric. Every text actually hints at the meaning that it is trying to supress, because it is defined by it... :)Deconstruction is the act of reading a text "Against its grain", against its principle argument, against the direction in which it wants to take you.... I want to use a film as an example "KUCH KUCH HOTA HAI". This film shows that when Kajol is a tomboy and Rani is a very feminine, vulnerable person, Shahrukh falls for Rani. He has no passion whatsoever for Kajol. After the interval, Kajol enters in a saree, long hair and trips/stumbles during Basketball session. SRK now feels attracted towards her.

The film makes an argument that "Gehri dosti ke peeche kahi na kahin gehra pyar hota hai"... I want to read the film against its grain, so I would say that it is not their true friendship which makes love possible at the end. Earlier, as a Tomboy, Kajol was SRK's equal- she even defeated him at the game. Later, she becomes the subservient, vulnerable female figure, which is ideal "wife material", and at that point, he falls in love with her. I would argue that the film journeys from a relationship of equality (friendship) to a relationship of inequality (marriage). This is how I have challenged the basic argument of the film.
Is this deconstruction? Maybe, maybe not. Don't quote me on this, but this is the way I understand it.

Friday, January 11, 2008

अशीच अमुची शाळा असती- भाग २

ह्या वर्गात तरी मला भरपूर साधनं दिसली, आणि भरपूर निर्मितीक्षमताही. आता पाठ्यपुस्तकच नाही तर ही शिक्षिका काय आणि कुठून शिकवणार हे आधी मला कुतुहल होतं. तर त्या दिवशी "library visit असा कार्यक्रम होता. तिने मुलांना एक छोटंसं लेक्चर दिलं- कि लायब्ररीत कशाला जातोय, काय करायचंय वगैरे. शिवाय handouts होतेच सगळं समजावायला!!!

खरंच, इथे त्यांना handouts दिले नाही, तर उद्या पालक येऊन कोर्टकेस करतील या भीतीने handouts वाटतात, की एकूण कागद फुकट, प्रिंटिंग फुकट, कंप्युटर्स सदा हाताशी, तर handout बनवायला काय जातंय, ह्या विचाराने, कोण जाणे, पण कागदांचा जणू महापूर लोटलेला असतो। Articles, photocopies, assignments, course syllable, graphic organizer, lists, agenda, study guides देवा देवा देवा, ते सुद्धा डबल साईड नव्हे! एक ना दोन शेकडो प्रकारचे कागद पोरांना द्यायचे, त्यांनी ते हरवायचे, आपण पुन्हा थोड्या extra copies हाताशीच ठेवायच्या, पुन्हा वाटायच्या, हे इतकं अंगवळणी पडलेलं, की ते नाही केलं तर आपल्यालाच आपण किती कोत्या मनोवृत्तीचे आहोत असं वाटायला लागतं. खरंच ह्या कागदांनी अभ्यास करणाऱ्यांना पुढे उपयोग होत असेल, पण प्रत्येक गोष्ट audio + visual, द्रुक-श्राव्य, दोन्ही माध्यमातून मिळायलाच पाहिजे, ही सवय लागल्यावर, आणि handout आहेच मदतीला, हे आश्चासन असल्यावर शिक्षिकेने वर्गात कितीही घसाफोड करून स्पष्टीकरण दिलं, तरी त्याला काय किंमत उरते? Handouts च वाटायचे असतील, तर पोरांनी correspondence course च का करू नये, असा प्रश्न मला अनेकदा पडला आहे. पुन्हा, दोन बाजू आहेतच.


तर अशी सगळी जय्यत तयारी करून आमची जत्रा शाळेच्या लायब्ररीत पोचली। तिथे computer-instructor ने पोरांना समजावलं, की internet वर रीसर्च कसा आणि का करायचा, कोणते "डेटाबेसेस" वापरायचे, त्यातले कोणते लेख हे अभ्यासासाठी योग्य असतात (peer reviewed articles) इत्यादि... ही मुलं नुकती ७वीत आलेली, आणि त्यांना माहितीचं इतकं भंडार उपलब्ध आहे, जे आम्हाला पदवीच काय, पदव्योत्तर शिक्षणातही मिळालं नव्हतं. खरंच, पुढील शैक्षणिक प्रगतीचा पाया इथे बांधला जातोय, हे जाणवलं. पोरंही आजकाल कम्प्युटर्स सर्रास हाताळू लागली आहेत, त्यामुळे त्यांनी पटापट पासवर्ड वगैरे घालून साईटस उघडल्या, आणि कामाला लागली...

लायब्ररीत हा रीसर्च करून त्यांना त्याविषयी एक प्रेसेंटेशन तयार करायचं होतं। विषय त्यांनी त्यांच्या आवडीचा निवडायचा होता. एका शाळेत तर प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक कंप्युटर अशी सोय होती. तिथल्या मुलांनी म्हणे Science Project मधे झाडांचे वर्गीकरण, किडे किंवा प्राण्यांचे जीवनचक्र, ह्या विषयांवर i-movies बनवल्या होत्या!!! अगदी पार्श्वसंगीत, संपादन, सगळं साधून....

सोयी-सुविधा आहेतच, पण त्यांचा योग्य विनियोगही केला जातोय, हे अमेरिकन शिक्षणपद्धतीचं खास वैशिष्ट्य पाहून खरंच कोणाच्या मनात आदर निर्माण होणार नाही? पण निर्मितीक्षम शिक्षणपद्धतीसाठी नेहमीच साधनांची, सोयींची आवश्यकता असते असं ही नाही!!! निरीक्षणाच्या दुसऱ्या खेपेला मी वर्गात पोचले, त्या आठवड्यात पोरं पिकनिकला जाऊन आली होती। आणि त्या दिवशी वर्गात पिकनिकची गाणी सादर करणं चाललं होतं. एखाद्या प्रसिद्ध गाण्याच्या चालीवर, पिकनिकचा अनुभव सांगणारी गाणी पोरांनी स्वत: रचली होती... त्यातून त्यांना कवितेच्या मूलभूत तत्त्वांची माहिती सहजच घडत होती- यमक, वृत्तात बसणारे शब्द, ह्यांचा विचार स्वत: करून शिवाय पिकनिकचा आशय त्यात येणं, हे सगळंच आपसूक साधत होतं. ही गाणी एकट्याने नं बसवता ग्रूपने बसवायची होती, म्हणजे मुलांच्या वैयक्तिक क्षमतेचा विचारही त्यात होता.

Edu-tainment, म्हणजेच, education with entertainment, ही संकल्पना प्रत्यक्षात आणायला दरवेळी पैसे लागतातच असं नाही। आम्ही लहान असतांना कवितांना हिंदी चित्रपटगीतांच्या चाली लावून पाठ करायचो. पण त्याच चालीत स्वत: कविता करावी, हे आम्हाला कधी सुचलंही नाही, किंवा कोणी सुचवलं ही नाही...... पाठांतरावर भर देण्यात निर्मितीक्षमता मेली, हे कोणाच्या लक्षात कसं आलं नाही? मुलांना आपल्या देशात साहित्य, कवितांची गोडी लागतच नाही, त्याचं कारण हेच तर नसेल? इथे मुलांसाठी अभ्यासेतर वाचनाच्या साहित्याचा दर्जा, आणि संख्या, हा तर एक स्वतंत्र विषय आहे. हॅरी पॉटरचं फक्त नाव आपल्याला माहिती आहे, पण हॅरी हा काही बालसाहित्यातला पहिला आणि शेवटचा हीरो नव्हे. दरवर्षी बालसाहित्यासाठी लेखकांना Newberry Awards जाहिर केले जातात. त्या पुस्तकांचा नाद मलाही चटकन लागला, इतका दर्जा उत्तम होता.

हेच नव्हे, असे कितीतरी अनुभव दर निरीक्षणात येत होते। साधी गोष्ट- मुलांना एका कथेतल्या पात्राचे व्यक्तिचित्रण करायचे आहे, तर त्यासाठी काय युक्ती, की एका chart वर डोळे, हृदय, ओठ आणि पायांचे चित्र असणारे कप्पे करायचे. डोळ्यांच्या कप्प्यात, त्या पात्राने काय बघितले, ओठ म्हणजे त्याने कोणते उद्गार काढले, हृदय म्हणजे त्याच्या भावना, असे विश्लेषण पोरांनी केले. खरंच किती साध्या गोष्टींतून मुलांसाठी आनंद निर्माण करता येतो, आणि जिथे शिकण्यात आनंद आहे, तिथेच शैक्षणिक प्रगती आहे, हो ना? अभ्यासासारख्या रटाळ गोष्टीला सुरस बनवून मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी फक्त विचारांची दिशा बदलण्याची आवश्यकता आहे.

पु।लंच्या एका कथेत असं काहितरी होतं, की आमच्यावेळी गणिताची पुस्तकं म्हणजे रूक्ष आकडे आणि आकृत्या, पण आजकाल कशी गोंडस चित्रं असतात! मन्याने सर्कशीत ३ विदूषक पाहिले, तिथे लगेच विदूषकांचं चित्र, अशी गंमत असते... म्हणजे we are on the right track, हे ही नसे थोडके!

हे मला नवीन होतं, ज्या पद्धतीने मी शिकले, तीच पद्धत बरोबर, असा प्रतिगामी विचार करून इथे शिक्षिका म्हणून माझा निभाव लागणार नाही, हे त्या निरीक्षणांतून लक्षात आलं. मग माझ्या वर्गात मी मुलांना persuasive essay writing शिकवायला जाहिरातींचा आधार घेतला.

वर्गातल्या प्रत्येक गटाने एखाद्या नवीन वस्तूची जाहिरात तयार करायची, असा प्रोजेक्ट बनवला। त्यात hybrid car, health food restaurant, ipod असे नाविन्यपूर्ण choices ठेवले. सहसा लोक जे घेऊ पाहणार नाहीत, त्या गोष्टींची जाहिरात करतांना persuasive strategies वापरण्यावर जास्त भर द्यावा लागेल, असा विचार त्यामागे होता. जाहिरात सादर करतांना प्रेक्षकांनी प्रश्न विचारायचे होते- उदा. “मी म्हातारी आहे, तर तुमचा ipod मला वापरता येईल का?” त्या प्रश्नांना उत्तरं देतांना तुमच्या rhetorical strategies चा कस लागणार होता...... मुलांना हा प्रोजेक्ट आवडला, त्यातच त्याचं यश आहे, अशी मी स्वत:ची पाठ थोपटून घेतली.


पण सगळ्याच प्रकारच्या ज्ञानाला काही गोडगोड, मनोरंजक, सुंदर वर्ख लावून मुलांपुढे ठेवता येत नाही, हे ही तेवढंच खरं. जेंव्हा मूलभूत संकल्पना शिकवायच्या असतात, तेंव्हा खरी कसोटी असते. कुठलंही साहित्य, कथा, कविता वाचत असतांना त्यातून स्वत:चे अर्थ स्वत:च शोधता आले पाहिजेत, ही सवय मुलांना लावणं मला फारसं जमलं नाही, आणि कित्येक अनुभवी शिक्षकांनाही ते अजून साध्य झालेलं नाही. त्या बाबतीत अमेरिकन शिक्षणपद्धती मला जरा वरवरची, उथळ वाटली. The road to hell was made with all good intentions- असं काहिसं..... कसं, ते बघूया पुढच्या भागात!
Published on esakal.

Wednesday, January 09, 2008

अशीच अमुची शाळा असती- भाग १

शाळा सुटली, पाटी फुटली,
आई मला भूक लागली :)
लहानपणी हे गाणं म्हटलं त्याला खूप दिवस झाले। माझी १०वी नंतर शाळा सुटली त्याला जवळजवळ १२ वर्ष होऊन गेली, आणि त्यानंतर शाळेत जायचा प्रसंग आला तो सरळ MA, M.Phil. झाल्यावर, थेट अमेरिकेत, शिक्षिका होण्यासाठी Ed.M. मधे दाखल झाल्यावर! Ed. M. म्हणजे आपल्याकडे बी. एड असतं तसंच, फक्त पदव्योत्तर अभ्यासक्रम (Masters) असल्यामुळे थोडं अधिक demanding म्हणायचं. निदान मला तरी ते अधिक demanding वाटलं- त्याचं कारण हे नवीन "अमेरिकन शिक्षणपद्धती" हे रसायन ही असू शकेल.

ह्या अमेरिकन शिक्षणपद्धतीला समजून घेतांना बरेच प्रश्न पडले, बरंच आश्चर्यही वाटलं, आणि तितकंच कौतुकही! पुन्हा सर्वाथाने शाळेत जातांना (इथे विद्यापीठालाही "स्कूल" म्हणतात हे तर प्रसिद्धच आहे ) इतकं काही शिकायला मिळालं, की शिक्षिका कसली होतेय मी- विद्यार्थिनीच बनले पुन्हा एकदा!!!

अगदी पहिला प्रसंग आठवतो: पहिल्या दिवशी विद्यापीठातल्या वर्गाला गेले तो! तिथे जायचं, शांतपणे टिपणं घ्यायची, प्राध्यापकांचा प्रत्येक शब्द ब्रह्मवाक्य मानायचा, ह्या पठडीतली मी. पोचले, तर वर्गात सगळेजण गोलात बसलेले, आणि त्यात प्राध्यापक कुठले, हे मला कळायचं एकमेव कारण म्हणजे मी आधी त्यांना प्रवेशाच्या संदर्भात भेटले होते! मग सर्वप्रथम "ओळख-परेड" सुरू झाली. प्रत्येकाने फक्त आपलं नावच नाही, तर आपल्याविषयी एखादी विशेष गोष्टही सांगायची, आणि प्रत्येकाने "स्मरणशक्ती" खेळाप्रमाणे आधीच्या सगळ्यांची नावं आणि विशेष लक्षणंही लक्षात ठेवून सांगायची! आता आमच्या वर्गात जरी फक्त २४ लोक होते, तरीही ह्या प्रकारात जवळजवळ अर्धा पाऊण तास गेलाच. मधे मधे भरपूर विनोद, एकमेकांची थट्टा, कोणी मधेच उठून "coke" घेऊन आलेले, कोणी चक्क पाय वर घेऊन बसलेले....

इथे आपण नक्की शिक्षण विषयाच्या वर्गात आहोत, की सायंकालीन मनोरंजन शिबिरात आहोत, असा विचार मी करत असतांनाच प्राध्यापिकेने कोर्सचा पुढील आराखडा मांडायला सुरूवात केली.
प्रत्येकाला कोर्सची समग्र माहिती असलेलं syllabus दिलं। त्यात कोणत्या दिवशी कोणता धडा, कोणती पानं वाचून यायची, त्याचं वेळापत्रक होतं. कोर्सच्या दर टप्प्यावर कोणत्या assignments कुठल्या दिवशी द्यायच्या, त्याची माहिती, शिवाय प्रत्येक assignment चं सविस्तर स्पष्टीकरण होतं. प्रत्येक assignment कोणत्या निकषांवर तपासली जाईल, तेही लिहिलेलं. आणि वर प्रा. बाई विचारतात, “कोणाला काही प्रश्न आहेत का?” ह्यावर एकाने, “हा अमूक पेपर किती पानांचा हवा?” हे विचारूनच घेतलं. मुळात Graduate (आपल्या भाषेत Masters) level नंतर परीक्षा हा प्रकार साधारणत: नसतोच. त्या ऐवजी ५ पानी निबंध, छोटे Reflective Responses, किंवा वर्षाच्या शेवटी मोठं project अशा विविध तहेने प्रगती तपासली जाते. स्मरणशक्तीवर भर नसून विश्लेषणावर असतो. वर्गातल्या चर्चेतला सहभाग ही सुद्धा grade साठी महत्त्वाची बाब असते.


अमेरिकन किंवा एकूणच पाश्चात्य शिक्षणपद्धतीची पहिली ओळख अशी झाली, की इथे विद्यार्थ्यांना सगळी इत्थंभूत माहिती पुरवणं हे प्राध्यापक, प्रशासक, शिक्षणसंस्था ह्यांची पहिली जबाबदारी असते। मला आठवलं, SSC बोर्डात आपण पेपर लिहून एकदा का मख्ख चेहयाच्या supervisor/ Invigilator कडे तो दिला, की पुन्हा आयुष्यभर त्याची नि आपली गाठभेट अशक्यच! तो निदान परिक्षकांकडे तरी पोचावा, अशी प्रार्थना करण्यावाचून आपल्या हाती काही उरत नाही. परिक्षकांनी तो कसा तपासला हे विचारण्याचा हक्क भारतीय विद्यार्थ्यांना नाही, तो ह्या देशात तर मूलभूतच मानला आहे.

ह्या अशा विचारात मी असतांना बाईंनी पुढच्या चर्चेचा विषय सांगितला, "प्रत्येकाने आपल्याला शिक्षक किंवा शिक्षिका का व्हायचे आहे, आपल्याला शिक्षणक्षेत्राविषयी काय वाटतं ते सांगायचं"। प्रत्येकजण सांगायला लागला तसा, मला घाम फुटायला लागला- मी का शिक्षिका होते आहे? ह्याचं उत्तर मला स्वत:लाही त्या क्षणी फारसं स्पष्ट दिसत नव्हतं. लहानपणापासून शिकवायला आवडतं, आणि आपला आवडता विषय दुसयांनाही आवडावा, अशी साधी अपेक्षा. भारतात आपल्याला खरं म्हणजे "पर्याय" हा शब्द खया अर्थाने कळलेलाच नसतो. नोकरी मिळणे, पैसा कमावणे, हे एकमेव ध्येय ठेवून दरवर्षी लाखो डॉक्टर आणि करोडो इंजीनियर बाहेर पडतात. उरलेले लोक दुसरं जे जमेल ते करतात, अशी निदान काल-कालपर्यंत तरी परिस्थिती होती. त्या शिडीवरची सर्वात खालची पायरी म्हणजे शिक्षक होणे! पण लवकरच लक्षात आलं, की इथेही शिक्षकी पेशाला फारशी किंमत नाही. असं असूनही, काहिसा आदर्शवाद, काही स्वप्न घेऊन माझे सगळे वर्गमित्र-मैत्रिणी आपल्या भाषेवरच्या प्रेमामुळे इथे आलेले. लेखन, वाचन, कवितांशी दृढ नातं असणारे, केवळ नाइलाजाने ह्या वाटेला न वळलेले, समविचारी खरे मित्र मैत्रिणी मला पहिल्याच दिवशी सापडले, हे मात्र त्या चर्चेतून जाणवलं. काहींनी शाळेत अर्धावेळ शिकवलेलं, पण बरेचसे माझ्यासारखे- नवीन कोया पाटीसारखे...

पण ही माझी पाटी नुसती कोरीच नव्हे, तर अगदी नवीनसुद्धा होती, ते कळलं प्रथम मी इथली शाळा पाहिली तेंव्हा! ह्या कोर्ससाठी आम्हाला एका शाळेतल्या वर्गाचं ७ दिवस "निरीक्षण" करायचं होतं। तिथल्या शिक्षणतंत्राला स्वत:च्या संकल्पनांशी पडताळून पहायचं होतं. तर असा आमचा निरीक्षणाचा पहिला दिवस: एका उच्चभ्रू शाळेत आम्हाला पाठवलेलं. मी अखेरची शाळा पाहिली, ती भारतात दहावी झाले त्यावेळी, १२ वर्षांपूर्वी. त्यानंतर हा इथला वर्ग म्हणजे माझ्या स्वप्नातल्या शाळेपेक्षाही सुंदर! मुले ही देवाघरची फुले, म्हणून देवानेच त्यांच्यासाठी बनवलेला का काय, असा विचार पाय टाकताक्षणीच मनाला स्पर्शून गेला!

बाकांऐवजी सुबक क्रीम- निळ्या रंगाच्या अशा मोजून फक्त २४ खुर्च्या ! आणि वर्ग मात्र चांगला प्रशस्त। पुढे फळा, त्यावर Overhead लावायची सोय म्हणून खाली ओढायचा पडदा तयार. एका कोपयात टीव्ही कायमचा बसवलेला, तर वर्गाच्या मागच्या बाजूस मुलांसाठी ३-४ कंप्युटर्स मांडून ठेवलेलले. बाईंच्या टेबलावर त्यांचा स्वत:चा कंम्प्युटर आणि शेकडो रंगीबेरंगी फायली वगैरे, शिवाय त्यांना अख्खी दोन कपाटं पुढच्या कोपयात दिलेली. खोलीच्या कडेला room-heaters असतात, त्यामागच्या खिडक्यांजवळ मुलांसाठी साहित्य ठेवलेलं- पेन, कागद, हस्तकलेच्या खास कात्र्या, ५० एक स्केचपेन तर एका टोपलीतच ठेवलेले. कोणाला लागले तर खुशाल घ्या, वापरा, मात्र वर्गातून बाहेर पडतांना परत करून जा, असे. आजूबाजूच्या भिंतींवर चारही रंगीबेरंगी पोस्टर्स- काही लेखनकलेबद्दल, तर काही प्रसिद्ध लेखकांची वाक्य, काही शालेय जीवनात मुलांना प्रोत्साहनपर किंवा काही चक्क मजेदार- खोडसाळ Bart Simpson (Simpsons ह्या प्रसिद्ध कार्टून मालिकेतला) ला शिक्षा मिळालिये त्याच्या कारनाम्यांची यादी करून "I will not...” पुढे लिहायची... हे सगळं बघून आधीच हर्षवायू झालेली मी, आणि त्यात नजर दूरच्या कोपयाकडे गेली, तर तिथे चक्क एक छोटी Bookcase ठेवून तो कोपरा बंद केलेला. आणि आत छोटी गादी, एक छोटी खुर्ची ठेवून एकClassroom Libraryच तयार केलेली! वर्गातलं काम संपलं, की आरामात ह्या कोपयात जाऊन हवं ते पुस्तक काढून वाचायची मुलांना परवानगी होती, ईतकंच नव्हे, तर नोंद करून घरी न्यायची सुद्धा! मुलांना काय, मला सुद्धा हा वर्ग कधी सोडून जाऊच नये असं वाटायला लावणारा...

पण हा वर्ग तयार करण्यात शालेय संस्थापकांचा फारसा सहभाग नसतो। प्रत्येक शिक्षकाला वर्गातली पुस्तकं आणि TV, computer ह्या मोठ्या गोष्टी सोडल्या तर फारसं काही शाळेकडून मिळत नसतं. अनेक वर्ष थोडंथोडं जमवून, जुनी पुस्तकं विकत घेऊन, काही स्वत:च्या घरून आणून शिक्षक आपला संसार मांडतात. मुळात भारतात एकच वर्ग, आणि वेगवेगळे शिक्षक तिथे येऊन शिकवणार, ह्या उलट इथे प्रत्येक शिक्षकाला स्वत:चा वर्ग मिळतो, आणि मुलं त्यांच्या वय/ कुवत/ आवडीनुसार ते ते कोर्सेस घेणार आणि त्या त्या वर्गात जाणार. एकूण "कॉलेज" सारखी ही व्यवस्था असते. म्हणजे एखाद्या मुलाला गणित आवडत असेल, आणि त्यात गती असेल, तर तो ७वीत असूनही ८वीचं गणित घेऊ शकेल, तसंच जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश ह्यापैकी कुठलीही भाषा निवडू शकतो. त्या विषयांचे एकूण "credits” गोळा केले, की त्याला शाळेतून "graduation” मिळणार. शालांत परिक्षांचा प्रकार प्रत्येक राज्यानुसार वेगळा असला, तरी आजकाल "HSPA” ही परिक्षा पास होणं graduation साठी लागू लागलं आहे.

तर अशा ह्या वर्गात मी साधारण सकाळी ७.३० ला पोचलेले- आणि आता घंटा होऊन सामुदायिक प्रार्थना/ प्रतिज्ञा असलं काहीतरी म्हणायला कुठल्या ठिकाणी जायचं असा विचार मी करत बसले, तेवढ्यात रंगीबेरंगी फुलांचे ताटवे तशी मुलं वर्गात घोळक्या घोळक्याने शिरू लागली. गणवेष नसल्यामुळे काहीही घालायचं स्वातंत्र्य तर मुलांना असतंच. शिक्षिका आधीच तिथे होती, त्यामुळे ऊठून शिस्तित "Good morning ma'm” म्हणायचा प्रश्नच नव्हता... आणि एकदम आवाज कुठून आला कोण जाणे (Central Announcement system) म्हणून दचकून बघितलं तर सगळी मुलं ऊठून उभी राहिलेली. वर्गातल्या अमेरिकेच्या झेंड्याकडे तोंड करून, डावा हात छातीवर ठेवून एकदम "I pledge allegiance to the flag of the United States, and to the republic, for which it stands. One nation, under God, with liberty and justice for all.” असं म्हणून पटापट बसली सुद्धा! झाली प्रतिज्ञा. माझ्या मनात मात्र सारखी घोळत राहिलेली वाक्य:
“भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। माझ्या देशावर माझे प्रेम आहे...” किंवा इंग्रजी माध्यमातून शिकलेली "India is my country, all Indians are my brothers and sisters...” प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर छापलेली. इथे तर काय, पाठ्यपुस्तकच नाही! हा दुसरा धक्का. प्रत्येक राज्याच्या नियमानुसार फक्त "ध्येय" किंवा objectives त्या त्या वर्गासाठी ठरवून दिलेली. ती गाठायला तुम्ही शेक्सपियर वापरा, किंवा सलमान रशदी- ते त्या शिक्षिकेने ठरवायचं!


आणि हे individualization, customization फक्त राज्यांपुरतंच मर्यादित नव्हे, तर प्रत्येक गावाच्या प्रत्येक शाळेला करता येण्यासारखं आहे. म्हणजे असं, की टिळकनगरची शाळा ही फक्त टिळकनगर रहिवाशांच्या करभारातून, टिळकनगरच्या मुलांसाठी चालवली जाते. त्यामुळे त्या अभ्यासक्रमात शंकरनगरच्या रहिवाशांनी ढवळाढवळ करायचं कारणच काय? तसंच, शाळा चालवतांना त्यात Federal Money किंवा सरकारी मदतही जवळजवळ नाहीच्याच बरोबर मिळते...त्यामुळे शिक्षणविषयक धोरणंही गावादरगणिक बदलत जातात. आणि आमच्या न्यू जर्सीत गाव केवढं- तर खरंच दर ५ मैलावर बदलणारं. आता त्यात गोची अशी, की समजा New Brunswick ही गरिबांची वस्ती, आणि South Brunswick ही उच्च मध्यमवर्गीयांची, तर त्यांच्या शाळांतही त्यांच्या सांपत्तिक स्थितीचं प्रतिबिंब पडणार. श्रीमंतांच्या शाळेत कंप्युटर-लॅब, जिमनेशियम, लायब्ररीचा थाट, तर गरिबांच्या शाळेत साधे फळे आणि खडू व्यतिरिक्त काहीच नाही. आणि तरीही, ह्या सर्व "public schools” च म्हणायच्या बरं का... सरकारी शाळा. खाजगी शाळा मी पाहिली नाहिये, पण कल्पना आली साधारण, की अमेरिकेच्या ह्या भांडवलशाहीत पैसा आणि सत्ता टिकवण्याचा सोपा मार्ग- Let the rich get richer and the poor, poorer....असो, पण भांडवलशाहीची दोन रूपं जशी सगळ्या क्षेत्रात दिसतात, तशी शिक्षणक्षेत्रातही...
सकाळ च्या पैलतीर वर प्रकाशित।

Monday, January 07, 2008

भाषा

अगदी सरळ सुरुवातच करायची म्हटलं, तर माझ्या भारतातल्या शिक्षणाचा आलेख हा असा पुढीलप्रमाणे आहe :
१. नागपूरातल्या एका बऱ्याशा शाळेतून १० वी, त्यानंतर एका बयाशा कॉलेजमधून कला शाखेत १२वी.
२. तिथेच बी. ए. पदवी विषय इंग्रजी, मानसशास्त्र, संस्कृत.
३. पुणे विद्यापीठातून एम. ए. पदवी. आणि पुढे तिथेच एम.फील. इंग्रजी साहित्य विषयात
4. Masters with English Education, Rutgers University.

हा आलेख माझ्यासारख्या लाखो मुलींचा असेल. त्यातल्या हजारो पुढे विद्यापीठातून किंवा शाळांतून शिकवत असतात, किंवा गृहिणी होऊन संसार सांभाळत असतात. त्यातल्या जर काही शेकडो मुली लग्नानंतर अमेरिकेत आल्याच, त्यानंतर त्यांनी इथे उच्च शिक्षण मिळवलं आणि त्याच (कला ) क्षेत्रात कामाला लागल्या, तर अशा सर्वांनी मला जरूर पत्र/ईमेल पाठवा. कारण तुम्हाला (आपल्याला) माहिती नाही आपण कुठल्या दिव्यातून जात आहोत, आणि किती दुर्मिळ जातीचे आहोत. आपली भाषा ह्या देशात आलेल्या लाखो इंजिनीयर्स, शास्त्रज्ञ, व्यापारी, कर्मचारी, संगणकशास्त्रज्ञ ह्यांना कळत नसते, हा अनुभव इथे आल्यापासून मला रोज येतो आहे.

अगदी सुरुवातीला मी एका मित्राकडे जेवायला गेलो असतांना सहज सांगत होते, “मला इंग्रजी साहित्यातच पुढे, पीएचडी साठी प्रवेश मिळाला तर करायची आहे।” हे ऐकून नवऱ्याच्या मित्राने मुक्ताफळं ऐकवली, “त्यापेक्षा तू लॉ किंवा फायनान्स का करत नाहीस? त्यात पुढे फार स्कोप आहे!” मी गमतीत सोडून दिलं. पण नवरा नंतर मला म्हणाला, “ तू त्याला तिथेच ऐकवायचं होतंस- तुझ्या ह्या फार्मास्यूटिकल सायन्स मधे काही स्कोप नाहिये, तर तूच का नाही फायनान्स मधे जात?”

गोष्ट साधी आहे, पण त्यातला खोल परिहास माझ्या लक्षातच आला नव्हता, कारण मुळात मी माझ्या क्षेत्रात अतिशय समाधानी आहे। दुसरा जन्म दिला तरी मी काही दुसरी वाट धरणार नाही. पण "कला" क्षेत्रातल्या लोकांवर एक छाप कायम लादला गेला आहे, की एकतर आमच्यात दुसरं काही करायची कुवत नाही, म्हणून आम्ही इथे सडायला आलो, किंवा, कुवत असूनही एका हळव्या क्षणी अक्कल गेली शेण खायला, आणि सायन्सला प्रवेश मिळत होता, तरी आईवडिलांशी भांडून इथे आलो. हे दोन्हीही, सुदैवाने, आणि दुर्दैवाने, माझ्या बाबतीत साफ खोटं आहे। माझी आवड आणि माझ्या घरच्यांचा संपूर्ण पाठिंबा, ह्या दोनच गोष्टी होत्या माझ्या निर्णयामागे, आणि त्याचाही मला सार्थ अभिमान आहे. तरीही, त्रास होतो. होतोच.

कुठेही गेलं, की आमच्या मित्रमंडळींच्या घोळक्यात करीयर आणि नोकरीची चर्चा, हेच विषय। माझा नवरा एका औषधे बनवायच्या कंपनीत काम करतो, त्यामुळे त्याचे मित्रही ९०% त्याच क्षेत्रातले, आणि एकूण ट्रेंड बघता, त्यांच्या बायकाही साधारण त्याच, किंवा तशाच क्षेत्रातल्या, त्यामुळे तुमच्या कंपनीचं नवीन प्रॉडक्ट आणि आमच्याकडचे नवीन compounds घोळवण्यात त्यांना स्वारस्य. Lyophilization, freeze drying, molecule stability, dosage, clinical trials, in-human trials (pun un-intended) वगैरे शव्दांची माझ्याही कोषात भर पडली आहेच हळूहळू. पण ते माझं क्षेत्र नव्हे.

एवढ्यात मी ३ महिने एका शाळेत इंग्रजी शिकवत होते, ती माझी Internship होती. त्यात इतकं काही शिकायला मिळालं आणि इतक्या वेगळ्या शिक्षणपद्धतीशी जुळवून घ्यावं लागलं, की मी ते तीन महिने अगदी "भारलेल्या" अवस्थेत होते. माझे विद्यार्थी, माझी शाळा, माझा performance ह्याशिवाय मला काहीही सुचत नव्हतं. आणि त्यातून ह्या चर्चेचा कंटाळा आला, म्हणून मी तिथेच एका मित्राच्या लहान मुलीला खेळवत बसले. खरोखर मला लहान मुलं आवडतात, आणि त्यांच्याशी खेळतांना मी समजून घ्यायचा प्रयत्न करते, की माझ्या वर्गातल्या अमेरिकन मुलांचं बालपण कसं असेल? तर मी रमलेली असतांना अजून एक अनाहूत शेरा, “ अरे यार तेरी बीवी को daycare खोल के देदे!!! कितना अच्छा खिलाती है बच्चोंको! हम अपने बच्चोंको सब उसके पास भेजेंगे! ” माझ्या तळपायाची आग मस्तकात! Day care चालवायलाही काही qualification लागतं, हे तर गावीही नाही, पण खरं म्हणजे ते करण्यापेक्षा मी माझ्या उत्तम पोळ्याच का विकू नये? !!! ही जी भाषा सगळे "science/ engineering” वाले बोलत असतात, ती मला आजकाल कळू लागली आहें...

एका नवीन शिक्षणपद्धतीचा अभ्यास, एका नवीन संस्कृतीचा अभ्यास, वेगवेगळ्या सुरांत बोलणाऱ्या २५ मुलांशी एकाचवेळी संवाद साधायची कसरत, हे सगळं मी करते, त्यातले खाचखळगे सांगायला मी ही उत्सुक आहे, पण त्यांना त्यांच्या चष्म्यातून हे दिसलं तर ना!!
खरं म्हणजे अमेरिकेत येणारे भारतीय हे जास्त करून Science-related fields मधले विद्यार्थी तरी असतात, किंवा कर्मचारी तरी. अमेरिकेला चणचण आहे Scientifically qualified pool ची, हे तर सर्वज्ञातच आहे. पण सध्याचा भारत तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र, संस्कृतीशास्त्र (cultural theory) मधे अमेरिकेच्या, किंवा इतर पाश्चात्य देशांच्या ५ दशकं तरी मागे आहे, ह्याकडे दुर्लक्ष कसं काय करतो आपण? सर्वात प्राचीन संस्कृती असलेल्या आपल्या देशाला आता तिची किंमतच उरलेली नाही म्हणा, किंवा Struggle for survival मधे Sciences ना जास्त भाव आलाय म्हणा. कारण काहीही असो, दृष्टीकोन मात्र सर्वत: चुकीचा आहे, असं मला वाटतं.

परवा मी माझ्या नवऱ्याला एका शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला नेलं होतं- तो कार्यक्रम खरं म्हणजे "How to understand and appreaciate Indian Classical Music” ची कार्यशाळा होती। नवशिक्यांना शिकवतांनाही पं. अमूक अमूक जरा वरच्याच पातळीवर पोचले होते, आणि तानपुऱ्यातल्या षड्ज आणि पंचम तारा झंकारत असतांना त्यातून गंधार कसा उमटतो ते समजावण्याचा प्रयत्न करत होते. निरागस श्रोते पूर्णत: भांबावलेले!!! वादी, संवादी, ताल, लय, मात्रांचा हिशोब, संवादिनी, पट्टी, काळी एक, काळी दोन, ध्रुपद, धमार आणि ठुमरी, तराणा, घराणी, गायनशैली, स्वरालंकार ह्या शब्दांनी पार गठाळून गेले होते!

तेंव्हा मला नेमके आठवले अनाहूत सल्ला देणारे महाभाग! प्रत्येक क्षेत्राची एक स्वतंत्र भाषा असते, आणि जगात एक स्वतंत्र जागाही असते.

ह्यापुढे त्यांना माझ्याशी संवाद करायचा असेल, तर, “Zone of Proximal Development”, “Differentiation of Instruction”, “Bloom's Taxonomy”, “Student centered teaching” “Authentic Assessment”, “NCLB/ IDEA/ IEP/ New Jersey Core Curriculum Content Standards” ह्या विषयांत व्याख्यान ऐकायची तयारी ठेवावी. तसंच, अगदी साहित्यिक परिभाषा नाही, तरी निदान Pre-reading, pre-writing, figurative language, diction, word choice सारख्या संकल्पनांना सामोरं जायची तयारी ठेवून यावं -ही नम्र विनंती. परग्रहावरून आलेल्यांशी काय बोलणार? ?

Sunday, January 06, 2008

नातिचरामि...!


नातिचरामि...!
मेघना पेठेंनी लिहिलेली ही कादंबरी मला मझ्या सासरकडून भेट मिळाली- ज्यांनी ही कादंबरी वाचली, त्यांनाच ह्या वाक्यातले अनेक अर्थ समजतील. धक्काच बसला सर्वात आधी, पण मग लक्षात आलं, की त्यांनीही ती मला देण्याआधी वाचलेली नव्हती. नाहितर कितीही उदारमतवादी असले, तरी आई-वडिलांच्या पिढीकडून लग्न झालेल्या मुलीला भेट देण्यासारखं त्यात काहीही नाही, किंबहुना भेट न देण्यासारखंच बरंच काही आहे. पण खरंच ह्या कादंबरीच्या शिर्षकाइतकं फसवं, द्वयर्थी, तरीही सार्थ शिर्षक दुसया कुठल्या लेखनाचं आठवत नाही. (माझ्या वाचनाच्या छोट्या कक्षांत तरी नाही।)

नातिचरामि...! त्रिवार उच्चारण करून केलेला करार, किंवा अगदीच रोमॅंटिक होऊन म्हणायचं असेल, तर, दोन जीवांचं अग्नीला साक्षी ठेवून मीलन, जीवनात कधीही साथ न सोडण्याचं वचन. आमच्या लग्नात गुरूजींनी नीट अर्थ समजावून सांगितला होता त्याचा, सप्तपदीचाही. पण त्या वातावरणात भानच नसतं खरं तर ते ऐकायचं! सगळं मनासारखं असेल, तर ते नातिचरामि त्या क्षणी आपण आपोआपच मनात म्हणून टाकलेलं असतं. नंतर आम्ही एका अमेरिकन+भारतीय लग्नाला गेलो, तेंव्हा तिथे आम्हाला handouts मिळाले इंग्रजीतले- त्यात पुन्हा वाचला तो अर्थ, तेंव्हा माझा नवरा म्हणाला- हं... आता हे कळतं आहे. आपल्या वेळेचं काही आठवत नव्हतं! - मी ३ वर्षात रूळले आहे संसारात, त्यामुळे थोड्या कौतुकमिश्रित रागाने एक कटाक्ष टाकला त्या दिशेने! पण असो।

हे जन्माचं वचन किती विश्वासाने देतो-घेतो आपण... कधीकधी सर्वस्वाचा होम करायला लावणारं (domestic violence, fraud, alcoholics, एक ना अनेक कारणांनी) पण तो अशुभ विचार आपण मनात आणायचा नसतो. सर्वस्वाचा होम तरी परवडला, पण मधेच प्रतारणा? ती ही एका स्री कडून?
संसाराची एक एक वीट बारा वर्षात निखळत, मोडत गेलेली असली, तरी शारिरिक संबंधाचाच मापदंड मानणारा समाज, आणि रडत कुढत का होईना, फसवा का होईना, निरर्थक संसार रेटायला नकार देणारी स्त्री...

त्या स्रीचं अतिशय परखड, तरीही हळुवार आत्मकथन आहे हे. नातिचरामिचा गुंता स्वत:पुरता, आणि केवळ स्वत:पुरताच, सोडवू पाहणारं. मीरेने कोणाला उपदेश करायला, किंवा समाजाशी वाकड्यात शिरायला लिहिलं नाहिये ते (निदान तीचा मूळ उद्देश तरी तसा नाही... ओघाओघाने येतात स्त्रीस्वातंत्र्याच्या गोष्टी, पण त्या येऊ नयेत, हेच पहिलं वचन घेतलं होतं का अग्नीने स्रीयांकडून??? व्यक्तीत्व असण्याची मुभा नव्हती स्रियांना, त्या काळची गोष्ट नव्हे ही- म्हणून तर उभे राहतात प्रश्न- नवर्याला अगदी विचारपूर्वक, विधीवत सोडलं, किंवा त्याने हिला सोडलं म्हणून आठवणी, माया, शारिरिक ओढ- संपते का? कोणत्याही स्त्री-पुरूष नात्याचा खरा पाया कशात असतो हा प्रश्न विचारणारी मीरा... तिला ते उत्तर शेवटी मिळालं का? तिथपर्यंतचा हा प्रवास आहे. आणि तो वैचारिक प्रवास निव्वळ अद्वितीय आहे, असं मला तरी वाटतं!!!

प्रवासात दिसतात अनेक रूपांतले पुरूष- मित्र, स्नेही, सुह्रुद, सखा, पती, प्रियकर... वेगवेगळ्या कारणांसाठी ती त्यांच्यात गुंतुन जाते. तिचं भावविश्व समृद्ध करत जातात ते सगळे. कधी समाजमान्य नात्यांतून, तर कधी विवाहबाह्य संबंधांतून, ती परिपूर्ण होत जाते, असं म्हटलं तर blasphemy व्हायची! पण ते खरं आहे. गालिब पासुन गुलाम अलिंपर्यंत भावनांचा प्रवास आहे. आणि दुसरीकडे तत्त्वांची कोरडी भाषा, किंवा बोली भाषेतली इंग्रजी-मराठी खिचडी आहे. तिच्याच एका परित्यक्ता, दोन लग्नं मोडलेल्या मैत्रिणीच्या तोंडची तीन धोब्यांची कथा तर इतकी खुसखुशीत, की वाचणार्याला कोडं- की ही बाई खरंच धोब्यांचं सांगते आहे, की नवयांच? आणि खरंच त्या कहाण्या इतक्या सरमिसळू शकतात ह्याला हसावं का रडावं? Irony of life, indeed!

नवीन नाती जन्माला येतात ते क्षण फार सुंदर असतात. पुढे माणसं बदलतात, नातंही बदलायला लागतं, आणि त्या रंग बदललेल्या नात्याच्या चष्म्यातून जवळची माणसंच मग माणसंच अनोळखी वाटायला लागतात... किंवा रंग ऊडूनच जातात आणि स्वच्छ दिसायला लागतात. त्या दिसण्याचं काय करायचं? हा प्रश्न मीराला जीवनाने विचारला. आणि ती जे शिकली, तो साया स्रीजातीचा भावनिक इतिहास आहे- राजकिय नव्हे- भावनिक. स्वत:च्या आयुष्याची जबाबदारी सदाच पेलता येत होती तिला. पण ते अस्तित्त्व स्वयंपूर्ण नाही. शारिरिक आकर्षण, भावनिक आधार, मानसिक भूक, ह्या सगळ्या गरजा काही वेगवेगळ्या कप्प्यांत घालून त्यासाठी वेगवेगळी दुकानं शोधता येत नसतात. तिला भेटलेल्या सगळ्या व्यक्तींशी ती त्या ओढीने बांधली जाते (इथे ते पुरुष आहेत, ह्याला कितपत महत्त्व द्यायचं, हा ही प्रश्नच आहे.) पण everything comes with a baggage सारखा प्रकार!

ती शोधते प्रत्येक पुरूषात ते एक element जे प्रत्येक स्री खरं म्हणजे शोधत असते, पण त्याचं नाव घेऊ शकत नाही... स्वातंत्र्य! स्त्रिया स्वतंत्र झाल्या, पण पुरूष जोवर तितकाच स्वतंत्र होत नाहि, तोवर ते स्वातंत्र्य अपूर्ण आहे अशा भ्रमात राहते मीरा. आणि शेवटी तिला तिचाच एक सच्चा मित्र बाहेर काढतो त्या भ्रमातून (किंवा तिला दाखवतो ती दिशा- आणि तिला कळत जातं स्वत:चं खर्या अर्थाने स्वयंपूर्ण अस्तित्त्व!

मराठी भाषेतल्या किती स्री- पात्रांनी केलाय हा इतक्या टोकाचा प्रवास? पुन्हा- माझ्या वाचनक्षेतल्या कोणीही नाही... पाश्चिमात्य ट्रायल- एरर पद्धतीच्या नात्यांकडे मोठ्या तुच्छतेने पाहतो आपण, पण फरक पुन्हा हाच आहे, की जोवर स्वत:चा शोध लागत नाही आपल्याला, तोवर नाती, संबंधांची मिमांसा करत बसतो आपण। जिसने खुद को पा लिया उसके लिये जहान हुआ, न हुआ!!! नात्यांमधे जीव असतोच, असणारच, असायलाही हवा (संत नसाल तर) पण गालिबच्याच शब्दात, त्यांचं सौंदर्यं सांगते मीरा-


तेरे वादे पे जिये हम तो, ये जान झूठ जाना ।
के खुशी से मर न जाते, गर ऐतबार होता ॥

Wednesday, January 02, 2008

भैरवी

आद्य स्वर म्हणुनी तुला, झाले तुझी संवादिनी
षडज- पंचम भारल्या तारांत मी "गंधारूनी"।


वेदनेच्या उमटता लहरी कधी तानेतल्या
तेजात क्षणभर नाचले उन्मुक्त नभी सौदामिनी।

आज नाकारू कसे ते दुःख तू मजला दिले
काव्य त्यतील घेतले स्वप्नांतही मी मागुनी।


भाव एकाकार होते, अंतरातिल गूज ही
हृदयी तुझ्या जे उमटले, अश्रूत ते ह्या लोचनी।


भेटते द्वैतास बेदरकार आता रोजही
गायली संपूर्ण मी ही भैरवी द्वैतातुनी.