golden sands

English/मराठी लेखन, अमेरिकेतील जीवन, कविता, प्रवासवर्णन, स्फुट.

Name:
Location: New Jersey, United States

I write for myself.

Monday, August 27, 2007

अहं माउसास्मि

हैदराबादेत बॉंब फुटले
ग्रीस मधे लागली आग
गोन्सालिसने राजिनामा दिला
पाकिस्तानला आलाय राग


रीडिफ़ डॉट कॉम ला सिनेमाचं वेड
ई-महाराष्ट्र टाइम्सचे मराठी वॉलपेपर
आऊटलुकवर उच्चभ्रू चर्चा
प्रत्येकाचे आपापले आवडते ई-न्यूजपेपर।


फिरणाऱ्या पृथ्वीसारखं गरगरतंय डोकं
कळेना आता मी स्वयंपाक करू काय ?
ग्लेशियर वितळतोय, ओझोन संपतोय
ग्लोबल वॉर्मिंगवर शोधायलाच हावाय उपाय!


माहिती तंत्रज्ञानाचं हे युग
कळायला लागल्यात दुनियाभरच्या सुरस चमत्कारिक कथा
पण शेजारणीला ताप आला, बाहेर बर्फ, ही घरी एकटी,
तिची कोणाला दिसत्येय व्यथा?

किंवा असेल बुवा गुगलचं नवीन सॉफ्टवेअर,
आकाशातून आजाऱ्यावर झूम करणारं
रेड-क्रॉसला थेट संदेश पोचवणारं
गूगल तर आता आमचा देवच झालाय
वाट दाखवणारा, लाखो गोष्टींचा "शोध" घ्यायला
प्रवृत्त करणारा...

पण आज त्या गोष्टी आपल्या अंतर्मनात उरलेल्या नाहीत-
त्या आहेत Webshots, Blogspot, Orkut वर कुठेतरी.
आज त्या तंत्रज्ञानाने, मलाही केलंय
माहितीचं निव्वळ एक केंद्र-
० १ ० १ ० १ आकड्यांमधून बोलणारं, ऐकणारं.

शेकडो वर्षांपूर्वी शेक्सपीयर म्हणाला होता,
All the world's a stage!
आपण तेव्हाही बाहुल्याच होतो,
आताही बाहुल्याच आहोत
फक्त आपली बोटं बांधलीयेत आज माऊसला
"क्लिक-कर्ता, करविता आपणच आहोत"
अशा गोड भ्रमात!

Friday, August 24, 2007

चारोळी, ग्राफीटी

परक्या देशातले अनोळखी लोक
"आपल्यांपेक्षा" बरेच वाटतात
त्यांचे खोटे जिव्हाळे नि उमाळे
खोटेपणात तरी खरेच वाटतात!
===========================

ज्या प्रेमाने सगळे प्रश्न
सोप्पे झाले
ते प्रेम तुझं होतं की माझं?
की ...
हा विचार
न केल्यामुळेच
प्रश्न सोप्पे झाले ?

Friday, August 17, 2007

चरोळ्या

आकाशाच्या नि:शब्द पोकळीत
नाही संवेदना, वेदना ही नाही.
तरीही वाहतात ढगांसारखे शब्द
सांगायचे काही असो, वा नाही।
कोण मी? ह्या प्रश्नाचं उत्तर
त्या ढगांत शोधणारे
व्यर्थ भरलेल्या आभाळातून
थेँबांचे अश्रू ओघळणारे!
=========================
तुझ्या अबोल्यात दडलेले अर्थ
न शोधताही सापडताहेत सहज
अर्थांचे प्रश्न सार्थ व्हावे,
त्यासाठीच तर भावनांची गरज.