golden sands

English/मराठी लेखन, अमेरिकेतील जीवन, कविता, प्रवासवर्णन, स्फुट.

Name:
Location: New Jersey, United States

I write for myself.

Monday, March 13, 2006

साड्यांची गोष्ट

साड्यांची गोष्ट

बनारसी शालूची जर लग्नाला
जिजामाता चा बघावा थाट
ओरिसा ईक्कत आल्या धावत
कांजीवरम ने घातला घाट.

संक्रांतीला चंद्रकळा काळी
चैत्रात कैरी इरकलची,
साधीच धारवाड घालावी पावसात
इंदुरी खास मंगळागौरीची

दिवाळी झगमगते पैठणी काठांनी
भाऊबीज ओवाळते पुसायला
पुढच्या वेळी देशील का मला
चंदनी कोसा नेसायला?

डोहाळेजेवणाचा मरवा लपला
तलम म्हैसूरी पदरात
कलकत्ता माखली छोट्या पावलांनी
चिमणी झोपली पाळण्यात.

रेशमी साड्यांचा संपला मौसम
नेसावं नायलॊन कॊटन
भीशीची कोरा शाळेची कोटा
एखादी मधूनच चिकन.

साड्यांची नव्हे गोष्ट ही माझी
उभ्या आडव्या धाग्यांचं जीवन
जीन्सच्या क्रांतीत जपून नेस पोरी
माझी आवडती शांतीनिकेतन.
- प्राजक्ता

मराठी

मराठी असे आमुची मायबोली
तिच्या किर्तीचे तेज लोकी चढे
गोडी न राहे सुधेमाजी आता
पळाली सुधा स्वर्गलोकाकडे!

माझी मराठी खरंच "मायबोली" आहे, कारण, आज मी जी भाषा बोलते, वाचते, लिहते, त्या भाषेचे बाळ-कडू माझ्या आईनेच मला पाजले. ते "बाळकडू" मला तेंव्हा खरंच "कडू" वाटायचे, कारण आईचा नियम होता कि रोज शुद्धलेखनाच्या दहा ओळी लिहिल्याशिवाय झोपायचे नाही... पण आज इथे अमेरिकेतही माझं मराठी प्रेम शाबुत आहे ते त्या वेळी लागलेल्या लेखन-वाचनाच्या सवयीमुळेच!
आज कम्प्युटरवर मराठीची बाराखडी नव्याने टाईप करायला शिकतांना मला पुन्हा आईची आठवण येते आहे- माझ्या ब्लॊगवर मराठीतले पोस्टिंग पाहून सर्वात जास्त आनंद तिलाच होणार आहे हे नक्की :-)
मी इंग्रजी साहित्यात एम.ए. केले, मी आता मराठी पेक्शा जास्त कविता इंग्रजीत करते ह्याबद्द्ल तक्रार नाही तरी नाराजी ती बरेचदा व्यक्त करते!

थोड्क्यात पुराण आटपायचे म्हणजे (हे एवढंसं टाईप करायला मला अर्धा तास लागलाय, त्यामुळे तसाही आता धीर निघत नाहिये)- आता तुम्हाला ह्या ब्लॊगवरती मराठीसुद्धा वाचायला मिळणार आहे. लेख वगैरे लिहण्याइतकी (rather, type करण्याइतकी) सवड मला कधी मिळेल असं वाटत नाही, पण छोट्या कविता पोस्ट करू शकेन अधून मधून. तेंव्हा- वाचत रहा!!!!!!!